बिंब - प्रतिबिंब

समाजावर प्रसारमाध्यमांचा परिणाम होतो की माध्यमात फक्त समाजातल्या व्यवहाराचं प्रतिबिंब दिसतं – हा जवळजवळ ‘कोंबडी आधी की अंडं आधी’ सारखा न उलगडणारा प्रश्न झालेला आहे! जेव्हा समाजात एखादी वाईट घटना घडते तेव्हा हमखास त्याचं खापर प्रसारमाध्यमांवर फोडलं जातं आणि प्रसारमाध्यमांनी कसं जबाबदारीने वागायला पाहिजे त्याबद्दल कानपिचक्या दिल्या जातात ... त्याचवेळी माध्यमांची निर्मिती करणारी माणसं मात्र – आम्ही जे समाजात घडतं तेच तर दाखवतो – असा बचावात्मक पवित्रा घेतात. पण जेव्हा माध्यमातून काही खास निराळं आणि सकारात्मक चित्रण करायचा प्रयत्न केला जातो – तेव्हा मात्र त्यांच्या प्रयत्नांची विशेष दखल घेतली जात नाही. मला वाटतं, की जेव्हा प्रसारमाध्यमं असा काही विशेष प्रयत्न करतील तेव्हा आपण त्याची आवर्जून दखल घ्यायला पाहिजे. नुकत्याच पार पडलेल्या दिवाळीच्या दरम्यान मला जाहिरातीच्या माध्यमातून होणारे दोन वेगळे प्रयत्न मला दिसले - त्यांचीच ओळख मला करून द्यावीशी वाटते आहे.
दिवाळीच्या निमित्ताने यावर्षीसुद्धा नेहमीप्रमाणेच अनेक नवीन जाहिराती झळकल्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून दिवाळी जवळ आली की साबणासारख्या अगदी रोजच्या वापरातल्या वस्तूंच्यादेखील दिवाळीला लक्षात घेऊन नवीन जाहिराती बनवण्याची प्रथा सुरू झालेली आहे. ह्या जाहिरातींचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात वस्तूंच्या किंवा सेवेच्या जाहिराती सोबत काहीतरी सामाजिक विचार मांडायचा विशेष प्रयत्न असतो. खासकरून ‘दाग अच्छे है’ मालिकेतल्या जाहिराती आठवतात ना? कुणाला तरी मदत करताना कपड्यांवर डाग पाडून घेणारी मुलं – ह्या जाहिरातीतून आपण पाहिली आहेत. त्या मालिकेतल्या सुरुवातीच्या अनेक जाहिराती दिवाळीच्या वातावरणाला समोर ठेवूनच तयार झालेल्या होत्या. तसंच कपड्यांच्या एका जाहिरातीत देखील नेहमीप्रमाणे केवळ गोरी सुंदर मॉडेल घेण्याऐवजी मुद्दाम सावळ्या मुलीला घेऊन रंगरूपाविषयीच्या कल्पनांना छेद दिलेला होता आणि त्याऐवजी आत्मविश्वासाबद्दल एक विचार मांडलेला होता. सणासुदीला सर्वांना आनंदात सामावून घ्यावं असं सांगणारी अंध मुलांसोबत ‘कागदाचे फटाके’ फोडणार्‍या मुलाची गोष्ट सांगणारी जाहिरात बिगबाजार ने बनवली होती तशीच रेल्वेमधल्या सहप्रवाशांनी बिगबाजार मध्ये मिळणार्‍या वस्तूंच्या सोबत साजरी केलेली दिवाळी दाखवणारी एक जाहिरातही लक्षात राहण्या सारखी होती. आपल्यापेक्षा कमी आर्थिक स्तरावरच्या लोकांना सहभागी करून घ्यावं असा संदेश देणार्‍याही अनेक जाहिराती दिवाळीच्या आसपासच्या काळात केल्या जातात. दैनिक भास्कर च्या एका जाहिरातीत मोलकरणीच्या घरी जाऊन दिवाळीनिमित्त तिची गळाभेट घेणारी मध्यमवर्गीय गृहिणी तुम्ही पाहिली असेल. यावर्षीसुद्धा वेगवेगळ्या ब्रॅंडसतर्फे अशा प्रकारच्या जाहिराती करण्यात आल्या. एका सिमेंटच्या जाहिरातीमध्ये नव्याने बांधल्या जाणार्‍या बंगल्याचा मालक तिथल्या बांधकाम मजुरांच्या सोबत दिवाळी करताना दिसतो आहे तर एका जाहिराती मध्ये घरेलू कामगार बाईच्या श्रमाचं मोल एका तरुण मुलाला उमजताना दिसतं आहे. जरी ह्या सगळ्या जाहिरातीत आर्थिक विषमतेला छेद देण्याचा प्रयत्न केलेला असला तरी – हा विचार बहुतेकवेळा कुटुंबाच्या बाहेरच्या परिघातल्या विषमतेच्या बद्दल मांडलेला असतो. घराच्या उंबरठ्याच्या आतमध्ये असलेल्या विषमतेकडे मात्र ह्या जाहिरातींमधून काहीसं दुर्लक्षच झालेलं होतं. कारण बहुतेक सगळ्याच जाहिरातीतून घरातल्या गृहिणीचे घरकामाचे शारीरिक श्रम आणि त्यासाठी तिने खर्च केलेली भावनिक ऊर्जा काहीशी गृहित धरलेली होती. प्रत्येक घरात कुटुंबाच्या आतमध्ये जी श्रमविभागणी असते त्याविषयी मात्र ह्या जाहिरातीतून काही वेगळा विचार आजपर्यंत तरी दिसलेला नव्हता. पण हयावर्षी दोन मराठी जाहिरातीतून मात्र हा वेगळा प्रयत्न मला जाणवला म्हणून मला त्यांच्या बद्दल सांगायच आहे!

या दोन जाहिरातींपैकी - ‘नवं पाऊल’ नावाची जाहिरात सोशल मीडियावर बरीच प्रसिद्ध झाली होती – त्यामुळे अनेकांनी ती नक्कीच पाहिलेली असणार. दुसरी त्या मानाने कमी प्रसिद्धी मिळालेल्या जाहिरातीचं नाव आहे – ‘तिची दिवाळी’! ह्या दोन्ही जाहिराती दिवाळीत घरी बनवून खाल्ल्या जाणार्‍या पदार्थांशी संबंधित आहेत आणि त्या टिपिकल मराठी कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर मराठीतून बनवलेल्या आहेत – हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य ! जाहिराती म्हणजे मिनिटभरात सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टीच असतात. ह्या दोन्ही जाहिरातीतून दिवाळीत बनवल्या जाणार्‍या पदार्थांच्या भोवती एकेक गोष्ट गुंफलेली आहे. दिवाळीतले फराळाचे पदार्थ घरी बनवायच्या कष्टापासून सासूची सुटका करणार्‍या सुनेच्या नजरेतून ही गोष्ट ‘चितळे बंधू’
च्या जाहिरातीत आपल्या समोर मांडली आहे. वर्षानुवर्ष दिवाळीच्या आधी स्वयंपाकघरात खपून चकल्या, चिरोटे बनवणार्‍या आई, आजी, काकू, आत्या यांनासुद्धा दिवाळीशी जोडलेले इतर आनंद साजरे करायची फुरसत मिळाली पाहिजे – हा नवा विचार ह्या जाहिरातीमधून कौशल्याने समोर ठेवलेला आहे. ही जाहिरात बनवली आहे, अनेक परितोषिक मिळवणार्‍या ‘मुरांबा’ ह्या फिल्मच्या तरुण दिग्दर्शकाने! whatsapp आणि फेसबुक वरती ह्या जाहिरातीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला. अनेक महिलांनी त्याचं कौतुक केलेलं दिसलं पण त्याचसोबत अनेक लोकांनी - “घरी केलेल्या पदार्थांची सर विकतच्या पदार्थांना येत नाही” – अशाही कॉमेंट्स केलेल्या वाचायला मिळाल्या. आणि बहुतेक त्या कॉमेंट्सना उत्तर देत असल्या सारखी - ‘तिची दिवाळी’ नावाची आणखी एक जाहिरात पाहायला मिळाली. ही जाहिरात मला जास्तच “डेयरिंगबाज” वाटली! कारण ह्या जाहिरातीत ‘घरी बनवलेले पदार्थ’ खायची हौस असणार्‍या नवर्‍यालाच कामाला लावलेले आहे. त्यामुळे घरगुती श्रमांच्या विभागणीला जे आव्हान दिले गेलेले आहे – ते मला खूप महत्त्वाचे वाटते. आपल्या बहुसंख्य सणांच्या दिवसातल्या आनंदाचा डोलारा घरातल्या बायकांच्या श्रमांवर उभा असतो. ह्या दोन्ही जाहिरातींनी त्याची केवळ दखलच घेतली नाही तर – त्या वास्तवाला बदलण्याचे मार्ग सुद्धा दाखवून दिलेले आहेत. सध्या काही मोजक्या घरातून घरातले पुरुषसुद्धा घरकामात सहभागी होत असतील तरी आजवर ह्या विचारांना जाहिरातीसारख्या लोकप्रिय माध्यमातून अशी प्रतिष्ठा मिळालेली नव्हती – ते काम ह्या दोन जाहिरातींनी केलेले आहे. समाजातल्या सकारात्मक बदलांचे प्रतिबिंब असे प्रसारमाध्यमातून अधोरेखित झाले की त्या बदलांना गती मिळायची शक्यता वाढीला लागेल – असा मला विश्वास वाटतो !